Sanjay Raut on BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण विधेयकावर, शिक्षण व्यवस्थेवर, विद्यार्थी आंदोलन, संसद अधिवेशन तसेच राज्यातील राजकारणावर जोरदार टीका केली. नवीन शिक्षण विधेयकात केवळ शिक्षा आणि दंडाच्या तरतुदी वाढवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कायद्यामुळे परीक्षा व्यवस्था ‘फुलप्रूफ’ होणार नसल्याचे म्हटले.
राऊत म्हणाले की, पेपरफुटी प्रकरणातील शिक्षेची मुदत एक वर्षांवरून दहा वर्षे आणि दंडाची रक्कम एक कोटींवरून दहा कोटी रुपये करण्यात आली आहे. मात्र, फक्त आकडे बदलल्याने समस्या सुटणार नाही. सरकार कायदे करते, पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतर कायद्याचा दाखला देत त्यांनी सरकारवर कायद्याचा केवळ दिखावा केल्याची टीका केली.
विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत राऊत यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार, मुलींशी गैरवर्तन आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारला संसदेत प्रश्न विचारले जाणार असल्याचे सांगितले. इतक्या घटना घडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, देशातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली होती. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी आधुनिक भारत घडवण्याचे काम केले. मात्र, गेल्या दहा वर्षांत शिक्षण व्यवस्थेला मागे नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. आयआयटीसारख्या संस्थांची स्थापना काँग्रेस सरकारांनी केली, तर सध्याच्या सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला.
नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत यांनी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना जबाबदारी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. नंदन नीलेकणी यांच्यासारख्या तज्ज्ञाला शिक्षणमंत्री करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यातील राजकारणावर बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे विधान केले. “भाजपने गुणवत्तेच्या आधारे शिक्षणमंत्री निवडायचा ठरवला, तर मोदी यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचेच नाव असेल,” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचाही निर्णय फडणवीस यांच्या हातात नव्हता, असा दावाही त्यांनी केला.
‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमावर टीका करताना राऊत म्हणाले की, राजीनामा हा विद्यार्थी आंदोलनाचा विजय आहे. हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, अनेकांनी आत्महत्या केल्या, अनेकांवर लाठीमार झाला. त्यामुळे धन्यवाद विद्यार्थ्यांचे मानायला हवेत, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या पत्राचा उल्लेख करताना त्यांनी दिल्लीतील घटनांची जबाबदारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर असल्याचे म्हटले. दिल्ली पोलिसांना आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनच दिले जातात, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या आंदोलनापासून अलिप्त राहण्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विरोधात उभे राहण्याची भाजपची हिंमत नव्हती. आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपमध्येही मतभेद निर्माण झाले असून काही भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला.
संसद अधिवेशनाबाबत बोलताना त्यांनी सरकार अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचा दावा केला. सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनीही दबाव वाढवल्याचे सांगत आता केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे राऊत यांनी म्हटले.






