DNA मराठी

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय

census 2026

Census 2026 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३० दिवसांसाठी नियोजित असलेले जनगणनेचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून महानगरपालिकेने कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले.

या यशाबाबत आयुक्त डांगे म्हणाले, “नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या मोहिमेच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने स्वतःसाठी वेळेची उद्दिष्टे निश्चित करून शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. त्यामुळे जनगणना मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक गती मिळाली. मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्यात आल्या. तसेच दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील टप्प्यांचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण मोहिमेत सातत्य, वेग आणि अचूकता कायम राखणे शक्य झाले.”

अतिरिक्त आयुक्त मुतकेकर यांनी सांगितले की, जनजागृती आणि संवादावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी विविध नावीन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर चित्रफिती, दैनंदिन ग्राफिक संदेश, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स तसेच विविध समाजमाध्यमांद्वारे नागरिक, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला.

अचूक माहिती संकलन, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रभावी जनजागृती आणि संघभावनेच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ही कामगिरी भविष्यातील प्रशासकीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून जनगणना कार्यात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक आणि सहायक पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *