Ashok Kharat: पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे संतप्त झालेल्या खरातने त्या वेळेपासूनच खेमनर यांच्याविरोधात वैयक्तिक आकस ठेवला असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खरात याने आपल्या काही हस्तकांच्या माध्यमातून पत्रकार खेमनर यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचे प्रकारही केल्याचा आरोप होत आहे.
या सर्व प्रकारामुळे खेमनर यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला.या सततच्या छळाला कंटाळून अखेर पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ची परवानगी घेतल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांविरोधात पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे तसेच अब्रूनुकसानी संदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.या घटनेमुळे पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी कायदेशीर संरक्षण किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दबावाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.






