Junnar Murder Case : पुण्यात पुन्हा नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (१८ तारीख) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनतर तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानेच मुलीला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे जीव घेतला आहे.
दरम्यान, स्थानिक आमदारांचे गाव असलेल्या पिंपळवंडीत ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. स्थानिक तपास यंत्रणांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले आहे असून या अमानुष घटनेमुळे परिसरात संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत हे प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.






