Maharashtra Government: जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरिकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गेडाम यांनी जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण होईल आणि त्या भागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल याचा विचार विकास आराखड्यात असावा. त्यासाठी प्राधान्याच्या विशिष्ट विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात.
विविध शासकीय,अशासकीय संस्थांची मदत घेऊन कृषी आणि दुग्ध व्यवसाय आधारित क्लस्टरमधून निर्यात करण्याबाबत शक्यतांचा विचार व्हावा. अशा क्लस्टरच्या विकासासाठी अपेक्षित सुविधा उभारण्यावर भर द्यावा. एखाद्या क्षेत्राचा विकास करताना त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांचा विकास करण्याकडे अधिक लक्ष द्यावे.
जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा विचार करताना तेथील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्यावा. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे, असेही डॉ.गेडाम म्हणाले.
डॉ.गेडाम यांनी यावेळी जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव जल परिपूर्ण करण्यासाठी पुढील 30 वर्षाचे नियोजन करा, त्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. गावाच्या पाण्याची गरज लक्षात घेण्यासोबत नदी किंवा नाला प्रवाहितही राहील याचाही विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विकासाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येऊन प्राधान्याने गायसामुद्रे यांनी जलसंधारण योजनांचा आढावा सादर केला.
यावेळी जिल्हा विकास आराखडा, जलयुक्त शिवार योजना , गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत सरोवर अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.