IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्याची मालिकेपूर्वी भारतीय संघाचे सराव सत्र 12 सप्टेंबरपासून चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सुरू होणार आहे.
बांगलादेशविरुद्ध होणारी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेशचे सराव सत्र 15 सप्टेंबरपासून चेपॉक येथेच सुरू होणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. बेंगळुरू आणि अनंतपूर येथे 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, आकाश दीप, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि केएस भरत आणि इतर खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील.
याशिवाय, इतर अनेक खेळाडू आहेत जे दुलीप ट्रॉफीद्वारे टीम इंडियामध्ये आपला दावा सांगतील. यामध्ये देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, यश दयाल, बी साई सुदर्शन या खेळाडूंचा समावेश आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 चा भाग असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांसह भारत आपल्या कसोटी हंगामाची सुरुवात करणार आहे. पहिली कसोटी चेन्नईत तर दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाईल.
भारताची शेवटची कसोटी मालिका या वर्षी इंग्लंडविरुद्ध होती, जिथे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका 4-1 ने जिंकली होती. तेव्हापासून भारतीय खेळाडू आयपीएल आणि त्यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त होते, त्यानंतर भारताने झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचा दौरा केला. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे कारण त्यांनी नुकतेच पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-0 ने पराभूत केले आहे.
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांगलादेश 45.83 टक्के गुणांसह WTC टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारत 68.52 टक्के गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आपले स्थान मजबूत करण्याच्या इराद्याने प्रवेश करेल.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला सामना 6 तारखेला धरमशाला, दुसरा 9 तारखेला दिल्लीत आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे. बांगलादेशनंतर, भारतीय संघ पुन्हा न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे, ज्यांच्यासोबत त्यांना तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळावी लागणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी वेळापत्रक
पहिली कसोटी: 19-23 सप्टेंबर, सकाळी 9.30, चेन्नई
दुसरी कसोटी: 27 सप्टेंबर-1 ऑक्टोबर, सकाळी 9:30, कानपूर
भारत विरुद्ध बांगलादेश T20 वेळापत्रक
पहिला T20: 6 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता, धर्मशाला
दुसरा T20: 9 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता, दिल्ली
तिसरा T20: 12 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता, हैदराबाद.