DNA मराठी

BJP

sujay vikhe

Sujay Vikhe : माझं नाव चर्चेत आणूनच नका, दरवेळी पत्ता कट होतो : सुजय विखे

Sujay Vikhe: ‘राहुरी पोट निवडणूक आली, माझं नाव पुढं आलं. पुढे पत्ता कट झाला.. विधान परिषद निवडणूक आली.. पुन्हा माझं नाव आणि पत्ता कट… आता पुन्हा विधान परिषद आली, माझं नाव आलं, पत्ता कट.. यापुढं माझं नाव चर्चेत आणूच नका,’ असे वक्तव्य माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान करून संस्थावर कोणाची नियुक्ती करावी, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचेही सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डॉ. विखे यांचे जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्यावेळी नाव पुढे आले. मात्र, त्यांना संधी मिळालीच नाही. आता शिर्डीच्या साईबााबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डॉ. विखे पाटील यांचे नाव पुन्हा एकदा पुढे आले आहे. याच अनुषंगाने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, तुम्हीच माझे नाव पुढे आणता आणि पुढे पत्ता कट झाला म्हणता. त्यामुळे आता माझे नाव पुढे आणूच नका. संस्थानवरील नियुक्तीच्या प्रक्रियेत विखे पाटील कुटुंब कधीच नव्हते. तरीही शिर्डीकरांचा विखे पाटील यांच्यावर विश्वास आहे. विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. कोणीही आले तरी त्यांना शिर्डीच्या विकासासाठी काम करावेच लागेल. नाही केले तर शिर्डीचे लोक जाब विचारतील. माझ्या मते या संस्थानवर सुशिक्षित आणि समृद्ध माणसे यावीत. मोठमोठ्या कंपन्या चालविणारे, नावाजलेले, पद्मश्री, पदमभूषण असे लोक आले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा शिर्डीला होईल. अर्थात हे सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकत्र बसून यासंबंधी निर्णय घेतील, असेही डॉ. विखे म्हणाले.

Sujay Vikhe : माझं नाव चर्चेत आणूनच नका, दरवेळी पत्ता कट होतो : सुजय विखे Read More »

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

img 20260607 wa0006

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई

Salman Dolare : खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल असलेला सलमान डोलारे गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सलमान डोलारे लपून बसल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कल्याण क्राईम ब्रँच युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून तपासणी केली असता, सलमान डोलारे घरातील कपाटात लपलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा सुरू केल्यानंतर परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि इमारतीखाली नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कल्याण परिसरात खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनेक अनधिकृत इमारती उभारल्याचा आरोप आहे. युसुफ हाइट्स, मरियम टॉवरसह अनेक प्रकल्पांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. याशिवाय या इमारतींशी संबंधित फाईल चोरी प्रकरणी महापालिकेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचाही तपास सुरू आहे. सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच तसेच विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून करण्यात येत आहे. तपासादरम्यान केवळ सलमान डोलारेच नव्हे, तर त्याचे काही सहकारी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही अधिकारी देखील चौकशीच्या कक्षेत असल्याची चर्चा असून, सलमान डोलारेच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. आता या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई Read More »

img 20260607 wa0080

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातून ७ जून रोजी जेरबंद केले. तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन जवळील अरणगाव हद्दीत ही घटना घडली होती. या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजी विठ्ठल मोहिते (वय ५२), राजू रामदास मोहिते (वय ३६, दोघे रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड) अक्षय रामदास मोहिते (वय २७, रा. मालठा ता.हातगाव, जि.नांदेड), छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ) व दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा.दगडवाडी, ता.हातगाव, जि.नांदेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी (ता.किनवट, जि. नांदेड) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ झेंडीगुळा लोणी येथील आरोपींच्या घरी छापा टाकुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे कब्जातून १६ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विप्ट कार, बनवाट सोन्याची नाणी, कोयता असा एकुण २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड Read More »

img 20260606 wa0004

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता?

Maharashtra Politics : “६०० वर्षे मुघलांचे राज्य होते, १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते, ७० वर्षे काँग्रेसचे सरकार होते मग हिंदू समाजाला धोका नेमका गेल्या काही वर्षांतच कसा निर्माण झाला?” हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार फिरताना दिसतो. या प्रश्नाचे उत्तर राजकीय भूमिकेनुसार बदलू शकते परंतु त्यामागील मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर आहे. तो म्हणजे, धर्म खरोखर धोक्यात आहे की धोक्याची भावना राजकीयदृष्ट्या निर्माण केली जात आहे? भारतातील हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समुदाय आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, असंख्य श्रद्धास्थाने, विविध तत्त्वज्ञान, भाषा आणि सामाजिक रचना यांचा हा समाज आहे. अशा समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, असे मानण्यासाठी अत्यंत गंभीर आणि व्यापक स्वरूपाचे पुरावे आवश्यक असतात. परंतु सार्वजनिक चर्चेत अनेकदा भावनांचा आवाज तथ्यांपेक्षा मोठा असतो. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गेल्या काही दशकांत धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय न राहता निवडणुकीतील प्रभावी राजकीय साधन बनला आहे. पूर्वी विकास, रोजगार, शेती, शिक्षण किंवा आरोग्य यांवर केंद्रित असलेले राजकारण आता ओळख, अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरताना दिसते. कारण भीती ही आश्वासनांपेक्षा अधिक प्रभावी राजकीय प्रेरणा ठरते. यामुळेच आज गावोगावी “धर्मरक्षक”, “हिंदुत्ववादी नेता”, “समाजरक्षक” अशा उपाध्या घेऊन अनेक जण पुढे येताना दिसतात. प्रश्न असा आहे की, जर हिंदू समाज खरोखरच इतका शक्तिशाली, व्यापक आणि ऐतिहासिकदृष्ट्या टिकाऊ असेल, तर त्याच्या रक्षणासाठी इतक्या नव्या रक्षकांची अचानक गरज का भासावी? धर्माच्या रक्षणाची चिंता अधिक आहे की धर्माच्या नावावर राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची? लोकशाहीत मतभेद हे स्वाभाविक असतात. एखाद्या नागरिकाने एखाद्या पक्षाला मतदान केले नाही, एखाद्या नेत्याच्या विचारांशी सहमत झाला नाही किंवा एखाद्या धोरणावर टीका केली, म्हणून तो धर्मविरोधी ठरत नाही. राजकीय असहमती आणि धार्मिक वैर यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली गेली, तर लोकशाहीची सर्वात मोठी हानी होते. कारण मग प्रत्येक प्रश्न धर्माच्या चष्म्यातून पाहिला जाऊ लागतो. धर्म हा श्रद्धेचा विषय आहे मतदान हा राजकीय अधिकार आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कायमस्वरूपी जोडण्याचा प्रयत्न झाला, तर नागरिकत्वाची संकल्पनाच कमकुवत होते. एखाद्या व्यक्तीचे राजकीय मत वेगळे असू शकते, पण त्यामुळे तो आपल्या धर्माचा शत्रू ठरत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या समुदायाच्या काही व्यक्तींच्या कृतींवरून संपूर्ण समुदायाला दोषी ठरवणे हेही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. भारतीय समाजाने मुघल राजवट, ब्रिटिश सत्ताकाळ, फाळणी, आणीबाणी, दंगली आणि अनेक राजकीय उलथापालथी अनुभवल्या आहेत. तरीही समाज टिकून राहिला, कारण त्याची ताकद केवळ धर्मात नव्हे तर सहअस्तित्वात होती. त्यामुळे आज जर कोणता धोका असेल, तर तो धर्मापेक्षा संवाद हरवण्याचा, प्रश्न विचारण्याची सवय कमी होण्याचा आणि नागरिकांना सतत भीतीच्या मानसिकतेत ठेवण्याचा आहे. धर्म वाचवण्यापेक्षा लोकशाही जपणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लोकशाही मजबूत असेल, तर प्रत्येक धर्म सुरक्षित राहू शकतो. पण लोकशाहीच कमकुवत झाली, तर कोणताही धर्म, कोणतीही विचारधारा किंवा कोणताही समुदाय स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. म्हणून आजचा खरा प्रश्न “हिंदू धोक्यात आहे का?” हा नाही. खरा प्रश्न असा आहे की, आपण धर्माच्या नावावर भीती विकणाऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणार आहोत की लोकशाहीच्या मूल्यांवर?

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता? Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

img 20260604 wa0018

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

Pune Crime: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२, धंदा-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे:गोरख संभाजी सोनवणे(वय ३२ वर्षे – पती)संभाजी लक्ष्मण सोनवणे(वय ६२ वर्षे – सासरा), अलका संभाजी सोनवणे(वय ५५ वर्षे – सासू) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांना ‘विरा’ (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण व मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि “पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका” अशी तंबी दिली. नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली. त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता, पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि “हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा”असा अमानुष पवित्रा घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला. फ्लॅटसाठी 3 लाख आणि ‘अधिक मासात’ सोन्याच्या अंगठीची मागणी एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्याने तेजस्विनीकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. मे २०२६ मध्ये ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र,”आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,”असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली. २ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही.” त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन Read More »

img 20260604 wa0017

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा

Neet Exam: देशात एखादा घोटाळा उघडकीस आला, पेपरफुटी झाली, तरुण बेरोजगार राहिले किंवा शेतकरी संकटात सापडला की सोशल मीडियावर आणि चौकाचौकांत एकच सूर उमटतो “सरकार काय करत आहे?” प्रश्न योग्य आहे. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ज्यांना आपण मतदान करून निवडून दिले, त्यांना आपण कधी जाब विचारला आहे का? लोकशाहीत सत्ता आकाशातून पडत नाही. ती मतपेटीतून जन्माला येते. प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंच हा जनतेच्या मतांवर निवडून येतो. त्यामुळे समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ व्यवस्थेला दोष देणे पुरेसे नाही; त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेल्या लोकांना उत्तर मागणेही तितकेच आवश्यक आहे. आज लाखो तरुण पेपरफुटीच्या घटनांमुळे हवालदिल झाले आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा रद्द होतात. भरती प्रक्रिया रखडतात. शेतकरी उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आहे. हमीभाव, सिंचन आणि बाजारपेठेच्या प्रश्नांनी तो त्रस्त आहे. या प्रश्नांवर निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिल्यानंतर किती वेळा त्यांचा हिशेब मागितला? लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मतदाराचा सक्रिय सहभाग मतदानाच्या दिवशी संपतो. निवडणूक आली की विकास, रोजगार, शिक्षण आणि शेती यावर चर्चा होते; निवडणूक संपली की नागरिक पुन्हा प्रेक्षक बनतो. याच निष्क्रियतेतून उत्तरदायित्व हरवते. लोकशाही मजबूत करण्याचा एकच मार्ग आहे प्रतिनिधींना सतत प्रश्न विचारणे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली का? त्यांनी विधानसभेत किंवा संसदेत आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला का? आपल्या मतदारसंघासाठी निधी आणला का? या प्रश्नांची उत्तरे मागितली गेली तरच राजकारणाची दिशा बदलेल. कारण लोकशाहीत सत्ता ही जनतेची असते. सरकार बदलते, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात; पण मतदाराची जबाबदारी बदलत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या घोटाळ्यावर संताप व्यक्त करताना एक प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा ज्यांना मी मतदान दिले, त्यांच्याकडे मी कधी जाब मागितला आहे का? लोकशाही केवळ मतदानाचा अधिकार देत नाही; ती प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि जबाबदारीही देते. आणि कदाचित, याच जबाबदारीच्या जाणीवेतून अधिक उत्तरदायी राजकारणाची सुरुवात होऊ शकते.

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा Read More »

Maratha Reservation 1

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Vikhe Patil

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »