DNA मराठी

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई

img 20260607 wa0006

Salman Dolare : खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल असलेला सलमान डोलारे गेल्या दोन वर्षांपासून फरार होता.

कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सलमान डोलारे लपून बसल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.

कल्याण क्राईम ब्रँच युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून तपासणी केली असता, सलमान डोलारे घरातील कपाटात लपलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचनामा सुरू केल्यानंतर परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि इमारतीखाली नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कल्याण परिसरात खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनेक अनधिकृत इमारती उभारल्याचा आरोप आहे. युसुफ हाइट्स, मरियम टॉवरसह अनेक प्रकल्पांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. याशिवाय या इमारतींशी संबंधित फाईल चोरी प्रकरणी महापालिकेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचाही तपास सुरू आहे.

सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच तसेच विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून करण्यात येत आहे.

तपासादरम्यान केवळ सलमान डोलारेच नव्हे, तर त्याचे काही सहकारी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही अधिकारी देखील चौकशीच्या कक्षेत असल्याची चर्चा असून, सलमान डोलारेच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. आता या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *