Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत जोरदार टीका केली.
राऊत म्हणाले की, विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी मिळून “हरवले आहेत” या आशयाची जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे. “देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह हरवले आहेत. संसदेत या दोघांचे खासदारांनाही दर्शन झाले नाही. संसद चालवायची नसेल तर ती इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरच चालवा. २० हजार कोटी रुपये खर्च करून संसद भवन उभारण्याची गरज काय होती?” असा सवाल त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “जे गृहमंत्री ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देतात, त्यांनी त्या पदावर राहावे का, याचा विचार त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी करायला हवा. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहोत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत ते म्हणाले, “पुण्यात रात्रीच्या अंधारात गेले, पण जनतेसमोर का येत नाहीत? दहशतीच्या मार्गाने निवडणूक जिंकली तर तीच दहशत नंतर छळते.”
संघाच्या विचारधारेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “संघाची विचारधारा भारतीय संविधानाला मानत नाही. ५२ वर्षे संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला गेला नव्हता. त्यांना संविधान संपवायचे आहे. मात्र आंदोलन संविधानानुसार नव्हते, असे म्हणणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.”
यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आवाहन करत, “जंतर-मंतरवरील आंदोलन संविधानानुसार होते की नाही, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच अतुल लिमये यांच्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का, हेही सांगावे,” अशी मागणी केली.
राऊत यांनी दावा केला की, “संघातून वेगळा आवाज निघत असेल, तर मोदींनी संघात आपली माणसे पेरली आहेत.” तसेच, “आमच्या पराभवासाठी ८० हजार बैठका घेण्यात आल्या,” असाही आरोप त्यांनी केला.
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “राम मंदिरासाठी सर्वांनी बलिदान दिले आहे, केवळ संघाने नाही.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “फडणवीसांनी आधी केंद्रात येऊन शिक्षणमंत्री म्हणून काम करावे आणि त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करावा. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या मोदींच्या नजरेत फडणवीस असल्याचे दिसते.”
स्वतःविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले, “माझ्यावर नेमका कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला, हे मला माहिती नाही. आमच्यावर किती गुन्हे दाखल करणार? आमचे आयुष्यच गुन्ह्यांशी लढण्यात गेले आहे.”
जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “जयकुमार गोरे यांनी ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य कोणत्या आचारसंहितेत बसते? ते शिवसेना प्रमुख आहेत. आम्ही त्याला उत्तर दिले तर त्याला हुकूमशाही म्हटले जाते.”
शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले, “त्यांनी माझ्या आसपासही फिरू नये. मला ओळखायचा प्रयत्न केला तर ते स्वतः अडचणीत येतील.”






