Sunetra Pawar: मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. बीड आणि पुणे यांना थेट रेल्वेसेवेने जोडण्याचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही गाडी बीडहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधून पुण्यासाठी थेट रेल्वे धावल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यापूर्वी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली होती. आता पुण्याशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्याने बीडच्या प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाचा पर्याय निर्माण झाला आहे.
अजित पवारांच्या शब्दाची सुनेत्रा पवारांनी करून दिली आठवण
बीड-पुणे रेल्वेसेवेच्या शुभारंभावेळी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी पुढील वर्षी बीडहून थेट पुण्याला जाता येईल, असा शब्द दिला होता, अशी आठवण सुनेत्रा पवार यांनी सांगितली.
गेल्या वर्षी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्यानंतर आता अगदी एका वर्षाने बीड-पुणे रेल्वे सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
त्यांनी या रेल्वे प्रकल्पामागे अजित पवारांचे प्रयत्न आणि सरकारकडून मिळालेला निधी महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
बीडकरांचा पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क सुकर
बीड जिल्ह्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी यापूर्वी विविध मार्गांचा वापर करावा लागत होता. थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याने या भागातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. पुणे हे शिक्षण, रोजगार, उद्योग आणि व्यापाराचे मोठे केंद्र असल्याने बीडमधील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि विविध कामांसाठी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांना या रेल्वेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पुणे-बीड प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल. रेल्वे बोर्डाने या सेवेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. बीड आणि पुणे यांच्यातील थेट रेल्वे संपर्कामुळे केवळ प्रवाशांचीच सोय होणार नाही, तर व्यापार आणि व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.






