Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील सहआरोपी आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सचिव विनोद तोमर यांनाही न्यायालयाने दिलासा दिला.
हे प्रकरण 2023 मध्ये देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहा महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी निकाल राखून ठेवला होता आणि आज अंतिम निकाल देत सर्व आरोपांतून त्यांची मुक्तता केली.
निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी ही न्यायालयीन प्रक्रिया सत्याचा विजय असल्याचे सांगत, “माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला असता तर कोणतीही शिक्षा स्वीकारली असती. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणामुळे 2023 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे देशभरात मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली होती.






