DNA मराठी

Mahendra Thorve on Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप; अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी हालचाली केल्याचा दावा

mahendra thorve on sunil tatkare

Mahendra Thorve on Sunil Tatkare : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांशी संपर्क साधून आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थखाते हवे होते, असा खळबळजनक दावा थोरवे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विलीनीकरणाच्या 13 बैठकांवरून थोरवेंचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच विषयावर बोलताना महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात तब्बल 13 बैठका झाल्या होत्या, असा दावा थोरवे यांनी केला. जर सुनील तटकरे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी होते, तर या महत्त्वाच्या बैठकांमध्ये त्यांचा सहभाग का नव्हता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांनी विलीनीकरणाच्या प्रक्रियेबाबत आपल्याला पूर्ण कल्पना दिली होती, असे तटकरे सांगत असल्याच्या भूमिकेवरही थोरवेंनी आक्षेप घेतला.

अजित पवारांच्या निधनानंतर आमदारांशी संपर्क ?

महेंद्र थोरवे यांनी केलेल्या दाव्यानुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप थोरवे यांनी केला. तटकरेंना उपमुख्यमंत्रिपद आणि राज्याचे अर्थखाते मिळवण्याची इच्छा होती. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे तटकरेंचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, असा दावाही त्यांनी केला.

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’; थोरवेंची जहरी टीका

सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना महेंद्र थोरवे म्हणाले, तटकरे हे खोटे आणि कपटी आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या मुद्द्यावर तटकरे यांनी पुरेशी भूमिका मांडलेली नाही, असा आरोपही थोरवे यांनी केला. सुरुवातीला विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याचे सांगणाऱ्या तटकरेंनी आता वेगळी भूमिका घेतल्याचा दावा करत थोरवेंनी त्यांच्या विधानांवर प्रश्न उपस्थित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *