DNA मराठी

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी CCTV, AI च्या माध्यमातून पोलिसांची नजर

pune ganesh visarjan

Pune Ganesh Visarjan : गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी तब्बल 10 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच CCTV कॅमेरे, AI तंत्रज्ञान आणि विविध आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे.

ढोल-ताशा पथकांच्या संख्येवर मर्यादा

गणेश मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. प्रत्येक गणेश मंडळासोबत दोनपेक्षा अधिक ढोल-ताशा पथकांना परवानगी दिली जाणार नाही. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

112 ठिकाणी डेसिबल मीटर

ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे पालन होते की नाही, यावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. त्यासाठी शहरातील 112 ठिकाणी डेसिबल मीटरसह पथके तैनात करण्यात येणार आहेत. ध्वनिक्षेपक आणि इतर ध्वनिवर्धक यंत्रणांच्या वापरावरही नियमांनुसार नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो पोलिसांनी निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणूक किती वेळ चालते, हे महत्त्वाचे नाही तर…

विसर्जन मिरवणूक नेमकी किती वेळ चालते, यापेक्षा ती शांततेत, उत्साहात आणि सुरक्षितपणे पार पडणे हे पोलिसांचे प्राधान्य असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

“मिरवणूक किती वेळ चालेल, हे आमच्यासाठी प्राधान्य नाही. मात्र विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि सुखरूप साजरी व्हावी, हे आमचे प्राधान्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *