Bhingar Ganesh Visarjan : भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गुलाल उधळण्यावरून पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
या घटनेनंतर भिंगार परिसरात संतापाची लाट उसळली. उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि भिंगार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या कारवाईमुळेच लाठीचार्ज झाला, असा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
घटनेनंतर गणेश विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबवण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी भिंगार वेशीजवळ रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. अनेक गणेश मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती रस्त्यावरच थांबवून ठेवल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी रात्री दोन वाजेपर्यंत भिंगारमध्ये रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्यासह गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
भिंगारमध्ये मोठ्या संख्येने गणेश मंडळे विसर्जनासाठी निघाली असताना अचानक निर्माण झालेल्या या तणावामुळे संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावर गणपतीच्या मूर्ती थांबवून कार्यकर्त्यांचा ठिय्या आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त, अशी परिस्थिती रात्री उशिरापर्यंत कायम होती.
तर दुसरीकडे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे.
ज्या ठिकाणी सौम्य लाठीमार झाला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. ट्रॅक्टरवर लावण्यात आलेली ट्रॉली हलत असल्याने त्यावरील मुलांना खाली उतरवण्यासाठी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमार करण्यात आला होता मात्र, लाठीमारचा व्हिडिओ व्हायरल करत दीपक वाघस्कर यांच्यावरच लाठीमार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.
दीपक वाघस्कर यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर सत्य समोर येणार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सुदर्शन मुमक्का यांच्याकडून देण्यात आली आहे. तर दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी भिंगार येथील तीनही गणेश मंडळांचा गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय असून आज भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला आहे.






