DNA मराठी

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा

omraje nimbalkar

Omraje Nimbalkar : एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर च्या चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनीही नेमके कारण माहित नसल्याचे सांगितले. “काही काम असेल म्हणून ते आले नसतील. बैठक तर त्यांच्या कार्यालयातच होत आहे,” असे म्हणत दानवे यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान ही अनुपस्थिती घडल्याने राजकीय वर्तुळात तिची अधिक चर्चा रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *