Mission Tiger : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार, खासदार , पदाधिकारी फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून मिशन टायगर राबवण्यात येत आहे मात्र या मिशनला पुण्यात मोठा धक्का लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माहितीनुसार पुण्यातील एका माजी आमदाराने 15 ते 20 नगरसेवक आणि शहराध्यक्ष पद द्या अशी अट शिंदेंसमोर ठेवली आहे. याच बरोबर म्हाडाचे अध्यक्षपद किंवा विधानपरिषद यापैकी एकावर संधी द्या अशी अट देखील माजी आमदाराने ठेवली आहे.
शहराध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवा मग पक्ष कसा वाढतो ते दाखवतो असं माजी आमदारचं म्हणणं आहे.
माहितीनुसार मिशन टायगरला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं ओळखून या माजी आमदाराने शिंदेंच्या शिवसेनेकडे शहराध्यक्ष पदाची अट ठेवली आहे. शहरात पक्ष वाढवायचा असेल तर भाजपसोबत छुपी लढाई करावी लागेल आणि ती मीच करू शकतो, अस हा माजी आमदार शिंदे सेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठ नेत्यांना बोलल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मुंबईत काही नेत्यांसोबत तीन ते चार बैठका या माजी आमदाराच्या झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतची सर्व माहिती गेली असून लवकरच ते यावर निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
या माजी आमदाराच्या अटी मान्य करताना शहर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहितीही सध्या समोर आली आहे.