DNA मराठी

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

maharashtra epstein files

Maharashtra Epstein Files : प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामधील दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा समावेश आहे.

दीपाली सय्यद या व्यक्तीरेखेला अचूक न्याय देऊ शकतील याची खात्री असल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींमधील एक अतिशय महत्त्वाचे प्रकरण जगासमोर आणणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या सिनेमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *