DNA मराठी

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

anna hajare

Anna Hajare : माहितीचा अधिकार कायद्यातील दुरूस्तीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हजारे उपोषणावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर आयोगाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आणि हजारे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

या कायद्याच्या नियमावलीत सरकारने काही बदल केले आहेत. ते बदल अन्यायकारक असल्याचे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य आयुक्त पांडे, पुणे विभागाचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, छत्रपती संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर आज बुधवारी राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी हजारे यांचे कायदेशीर सल्लागार अॅड. श्याम आसावा, दादा पटारे, दत्ता आवारी उपस्थित होते.

आयुक्त पांडे यांच्याकडे हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांना न विचारता परस्पर दुरूस्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यासंबंधी समिती नियुक्त करावी, समितीच्या सूचना घेऊन त्यानुसार बदल करावेत, तोपर्यंत या तरतुदी स्थगित ठेवाव्यात अशी मागणी केली. यावर या भावना सरकारला कऴविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. आता सरकार पुढे काय भूमिका घेणार, पुढील चर्चा करण्यासाठी कोण येणार, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *