Gulabrao Patil : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली, तर राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यावरही त्यांनी खरमरीत भाष्य केले.
गुलाबराव पाटील म्हणाले, “कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, त्याने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याचं दुकान बंद झालं आहे. आता तो शिंदे साहेबांवर टीका करतोय. त्याला वाटत असेल की बोलल्यावर काही होणार नाही, पण तो चुकतोय.” पाटील यांनी पुढे सांगितलं की, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. “दोन दिवसांत त्याने माफी मागितली नाही, तर शिवसेना स्टाईलने त्याच्या तोंडाला काळं फासू,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, “संजय राऊत हा त्यांचाच माणूस आहे. त्यांच्याच सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे.”
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “काल त्यांना स्वप्न पडलं असेल. साधा एक आमदार निवडून आणू शकत नाहीत. फक्त सभांना गर्दी असते. मी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. पालिका निवडणुका येताहेत, त्यामुळे ही नौटंकी सुरू आहे.” पाटील यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली.
कुणाल कामराच्या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे यांच्यातील शाब्दिक चकमक तीव्र होताना दिसत आहे. या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.