Pune Lodge Case : पुणे शहरातील लॉज प्रकरणात पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फक्त एकच आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या विविध चर्चांना पूर्णविराम देत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
आयुक्तांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात संबंधित व्यक्ती लॉजमध्ये एकटाच गेला होता आणि त्याने तेथे आपत्तिजनक कृत्य केले. यानंतर मिळालेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात भादंवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडताना त्याने “आमच्यासोबत इतर पत्रकार होते, आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो” असा दावा केला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासात तो पूर्णपणे एकटाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या हा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. त्याला अटक झाल्यानंतर आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप केल्याच्या चर्चांनाही आयुक्तांनी फेटाळून लावले. “या संदर्भात आम्हाला कोणताही फोन आलेला नाही. कारवाई ही केवळ फिर्याद आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुपाली पाटील यांनी काही पत्रकारांची नावे घेत साजिश असल्याचा दावा करणारा अर्ज दिला आहे. मात्र, त्या अर्जासोबत कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. “आतापर्यंतच्या तपासात त्या आरोपांमध्ये तथ्य आढळलेले नाही, तरीही तपास सुरू आहे,” असे आयुक्तांनी नमूद केले.
सोशल मीडियावर पसरलेल्या “घटनेवेळी अनेक जण उपस्थित होते, काहींना मारहाण झाली” या दाव्यांनाही पोलिसांनी खोटे ठरवले. “तो एकटाच होता. त्याला पकडल्यानंतर काहींनी त्याला मारहाण केली होती, त्यामुळे बचावासाठी त्याने वेगळी कहाणी सांगितली असावी,” असे स्पष्टीकरण देण्यात आले.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील आणि संबंधित लॉजचे सखोल सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटना घडण्याच्या दोन तासांपूर्वीपर्यंतचा संपूर्ण मागोवा घेतला गेला. तसेच मागील दीड-दोन वर्षांचे लॉजचे रेकॉर्ड तपासण्यात आले असता, आरोपी यापूर्वीही तीन वेळा तेथे आला असल्याचे उघड झाले.
दरम्यान, त्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांबाबतही पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. “जर PITA कायद्यांतर्गत कोणतीही बेकायदेशीर कृती आढळली, तर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल,” असे आयुक्तांनी सांगितले.
सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. “तो अनट्रेसेबल आहे, मात्र लवकरच त्याला अटक करण्यासाठी आमची पथके प्रयत्न करत आहेत,” असे पोलिसांनी सांगितले.






