DNA मराठी

Payal Jambhare Case : पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; सासू-सासऱ्यांना अटक, पतीला चार दिवसांची पोलीस कोठडी

payal jambhare case

Payal Jambhare Case : पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पायलच्या सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीच पायलचा पती अक्षय झांबरे याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पायल झांबरे यांचा 1 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र, पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर पायलचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, तसेच पैशांसह सोन्याची मागणी केली जात होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पायलच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, दरवर्षी दिवाळीच्या काळात माहेरून सोने आणण्याची मागणी केली जात होती. यंदाही पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूपूर्वी पायलने आपल्या भावाला ‘माझी सासू जबाबदार आहे’ असा मेसेज केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर पायलचा शोध घेण्यात आला असता त्या मुकुंदनगरमधील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या. घटनास्थळी सुसाइड नोट आढळली नसल्याचेही वृत्त आहे.

पायलच्या मृत्यूनंतर स्वारगेट पोलिसांनी तिचा पती अक्षय, सासू मंगल, सासरे अरविंद आणि नणंद अक्षता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सासू-सासरे फरार होते. अखेर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान, अक्षय झांबरेला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पायल आणि आरोपींमध्ये नेमके कोणते वाद झाले होते, घटनेच्या दिवशी काय घडले, तसेच पैशांची आणि सोन्याची मागणी नेमकी कशासाठी करण्यात आली होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

आता पायलच्या सासू-सासऱ्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. पायलच्या मृत्यूमागची नेमकी परिस्थिती आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची सत्यता पोलीस तपासातून समोर येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *