Chhagan Bhujbal : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील विविध भागांत होर्डिंग्ज लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
या होर्डिंग्जमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त करा,” असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, नाशिकला सध्या पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. अनुभवी आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यास खड्ड्यांसह शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांचा मुद्दा आता राजकीय रंग घेत असून, येत्या काळात यावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






