Agriculture Minister Dattatray Bharane : नेवासा तालुक्यात अत्यल्प पाऊस, पावसाचा दीर्घ खंड आणि तीव्र पाणीटंचाईमुळे ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर उणी लागली आहे. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटणे, कांड्यांची लांबी व जाडी कमी होणे, ऊस बारीक पडणे, वजन घटणे आणि परिणामी एकरी उत्पादनात मोठी घट होणे, अशा गंभीर समस्यांमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
केवळ पूर्णपणे वाळलेल्या उसाचेच नव्हे, तर पाण्याअभावी वाढ खुंटलेल्या व उत्पादनक्षमतेवर परिणाम झालेल्या ऊस पिकाचेही पंचनामे व्हावेत, अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत कृषिमंत्र्यांनी ऊस नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.






