Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या खेळी अनेक वेळा पटलावर बिनधास्तपणे रंगविल्या जातात. पक्षफोड, बंड, कुरघोडी, युती, फुटी या शब्दांनी आपल्या राजकारणाची पोत अखेरची काही वर्षं पूर्णपणे व्यापून टाकली आहेत.
परंतु या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एखादा नेता असा असतो, जो सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी बदनाम व्हायला तयार असतो. त्याचं नाव आहे बच्चू कडू.
“मी बदनाम झालो, पण मंत्रालय मिळालं,” हे शब्द केवळ एका राजकीय खेळीचं समर्थन नाही, तर एका मनस्वी नेत्याच्या अंतर्मनातल्या भावनांचं प्रतिबिंब आहे. बच्चू कडू हे नाव आज केवळ एका राजकीय नेत्याचं नाही, तर शेकडो-हजारो दिव्यांगांच्या आशेचं केंद्र बनलं आहे.
शिंदे गटाच्या बंडामध्ये सहभागी होणं ही त्यांची एक ‘राजकीय चूक’ होती, असं ते स्वतः मानतात. परंतु या चुकीच्या निर्णयातून एक मोठा लढा यशस्वी झाला दिव्यांग मंत्रालय मिळालं.
हे मंत्रालय केवळ एका कुर्चीचं नाव नाही, तर अनेक अपंग, दिव्यांग बांधवांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा ठरला. आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून हजारो गोरगरिबांच्या जीवनात प्रकाश टाकणं हेच बच्चूभाऊंचं अंतिम ध्येय होतं.
“सत्तेसाठी नव्हे, आशीर्वादासाठी बंड” – ही ओळच त्यांच्या राजकीय भूमिकेची ओळख आहे. आज बच्चू कडू आमदार नाहीत. कदाचित मतदारांनी नाकारलं असेल किंवा ईव्हीएमने…
पण दिव्यांगांसाठी आज जे निर्णय घेतले जात आहेत, जे धोरणं बनत आहेत, ती त्यांच्यामुळे. त्यामुळे ते आजही जनतेच्या मनात घर करून आहेत.
आजच्या राजकारणात जेव्हा बहुतेकजण पदासाठी, ताकदीसाठी राजकीय बाजू बदलतात, तेव्हा बच्चूभाऊ कडू यांनी समाजासाठी आपली प्रतिमा खराब होऊ दिली – हे त्यांचं वेगळेपण अधोरेखित करतं.
बच्चू कडू हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी राजकारण करणारे नेते आहेत. त्यांची चूक त्यांनी मान्य केली, पण त्याच चुकांमधून काही लोकांच्या आयुष्यात बदल घडला – हीच त्यांची खरी ‘राजकीय विजय’ आहे.
“बदनाम होणं चालेल, पण त्यातून जर गोरगरिबांच्या आयुष्यात उजेड पडत असेल, तर तो त्याग पत्करावा लागतो,” असं म्हणणारे बच्चू कडू आजच्या मतलबी राजकारणाला एक प्रश्न विचारतात – “तुम्ही किती लोकांसाठी बदनाम व्हायला तयार आहात?”