Chandrapur Crime : सावली तालुक्यातील मौजा रखाडी येथे सुरू असलेल्या अवैध सुगंधित तंबाखू उत्पादन व पॅकिंग केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
या कारवाईत सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य, यंत्रसामग्री आणि वाहनासह एकूण ११ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजा रखाडी येथील विजय भांडेकर हा शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची साठवणूक करून मशीनच्या सहाय्याने त्याचे पॅकिंग करत असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
कारवाई दरम्यान HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, उत्पादन प्रक्रियेसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री तसेच एमएच-३४-सीजे-९६२५ क्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले. जप्त साहित्याची एकूण किंमत ११.३१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा माल गडचिरोली येथील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली असून मोठ्या प्रमाणात तंबाखूचे पॅकिंग करून विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भातील अधिक माहिती अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली.






