Jalgaon News : जळगावमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एमडी ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित ड्रग माफिया रईस हसन देशमुख याच्या अवैध घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. जळगावच्या इतिहासात अमली पदार्थ तस्कराविरोधात झालेली ही पहिलीच बुलडोझर कारवाई मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात आरोपींकडून कार, दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले होते.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला रईस हसन देशमुख सध्या पोलीस कोठडीत असून, तपासादरम्यान त्याने एमआयडीसी परिसरात नियमांचे उल्लंघन करून अवैध दुकान आणि घर उभारल्याचे निष्पन्न झाले.यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि जिल्हा पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत आरोपीचे अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली.
कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने आरोपीचे दुकान आणि घर जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर प्रशासकीय आणि आर्थिक कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत असल्याची माहिती पंकज गोसावी, उपायुक्त महानगरपालिका, जळगाव यांनी दिली.






