Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते सामान्य माणसांना आवडणारे नाही. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले, महाराष्ट्रातही तसेच झाले. आम आदमी पक्षामध्येही असे प्रकार झाले.
लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, ज्या पक्षाकडे पाहून मतदान केले, त्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे हा लोकांचाही अपमान आहे.दुर्दैवाने राजकारणाबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जाणारे आहेत म्हणून घेणारे तयार आहेत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींनीही स्वतः विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत. शेवटी जनता सर्व काही पाहत असते.-लोकांचा ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडत चालला आहे.-त्यामुळे जाणाऱ्यांनाही असे वाटते की ईव्हीएम असल्यामुळे काही अडचण नाही.
लोकांच्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारलाही आणि विरोधी पक्षांनाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.-विरोधी पक्षांनाही आम्ही सांगितले होते की, जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा. सरकारला जर एवढा आत्मविश्वास असेल की जनता आमच्या विचारधारेला आणि कामांना मतदान करते, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील असं बाळा नांदगावकर म्हणाले.
NDA ची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न
तर एनडीएवर बोलताना जर एखादा नेता पक्षात येणार असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या विचारांचे लोकही येणारच. त्याला कोणतेही नाव दिले तरी त्याचा फारसा अर्थ नाही.1967 मध्ये हरियाणामध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा जन्म झाला होता.तेथील एका आमदाराने अवघ्या नऊ तासांत तीन पक्ष बदलले होते.त्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा आला. मात्र त्यावरील वाद आणि निर्णय आजही सुरू आहेत.कायदा असला तरी त्याचे पालन होत नाही. न्यायालय तातडीने निर्णय देत नाही आणि अध्यक्षांकडे गेल्यानंतरही निर्णय होण्यास वेळ लागतो.त्यामुळे या सर्व बाबींचा काही जणांकडून फायदा घेतला जात आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले.






