Ahilyanagar News : यावर्षी पावसाला होणार उशीर आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी पिण्याचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानी सांगितले की, धरण क्षेत्र व अन्य उदभव क्षेत्रातून पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर वेळापत्रकानुसार गावात जाणार आहेत. त्यांच्यासाठीच्या पाण्याच्या उद्भव परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकले जाणार नाही. तेथील पाणी पुरवठा योजनेत किंवा गावच्या लोकसंख्येनुसार दोन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. या टाक्यांना कॉक बसवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल व ते वायाही जाणार नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
जनावरांसाठी चारा सध्या मुबलक असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच सहा दिवसात येईल व त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही विखे यांनी सांगितले.






