Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे.
आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.