Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवार यांना खोकला आणि छातीतील संसर्गाचा त्रास होत आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाशी संबंधित संसर्ग असून ब्रॉन्कायटिससदृश त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पुण्यातील रुग्णालयातून मिळाला होता डिस्चार्ज
शरद पवार यांना २ नोव्हेंबर रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना खोकला आणि छातीत वेदना होत असल्याने वैद्यकीय तपासणी आणि निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यानंतर ते मुंबईला रवाना झाले. मात्र, पुढील वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही पवार यांना पुढील तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली होती.
डॉक्टरांकडून प्रकृती स्थिर असल्याची माहिती
डॉक्टर प्रतीत समदानी यांनी पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून असून, आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीमुळे त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी समर्थकांकडून प्रार्थना केली जात आहे.






