DNA मराठी

Eknath Shinde: धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

img 20261105 wa0001

Eknath Shinde: सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन धर्म, संत समाज, भारतीय संस्कृती आणि धर्मरक्षणासाठी शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहीन, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय संत समिती विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, महामंडलेश्वर आणि गंगा महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे यांचा ‘सनातन मार्तंड पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांना ‘धर्मध्वजाधारक’ ही उपाधी देखील सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

वाराणसी येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित ‘संस्कृती संसद २०२६’ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. देशभरातून हजारो संत-महंत, धर्माचार्य, विचारवंत आणि युवक या तीन दिवसीय सांस्कृतिक महाकुंभात सहभागी झाले होते. यावेळी शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारून उपस्थित साधू संतावर पुष्पवृष्टी करून त्यांना वंदन केले.

भारतीय संत समिती विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी केलेला हा सन्मान हा माझा एकट्याचा सन्मान नसून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, वारकरी संप्रदायाचा आणि युवकांचा आहे. संत समाजाने दिलेला सन्मान सनातन धर्माच्या संवर्धनाची जबाबदारी अधिक दृढ करणारा असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

काशी ही भारताची आत्मा असून काशी आणि महाराष्ट्राचे नाते शतकानुशतकांचे आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून, तर संत नामदेवांनी पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका नेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीचे गागाभट्ट महाराष्ट्रात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले; अमानुष अत्याचार सहन करूनही धर्मांतर स्वीकारले नाही, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या संत आणि शौर्यपरंपरेचा गौरव केला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ या हिंदुत्ववादी विचारांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, पालघरमध्ये साधूंची हत्या झाल्यानंतर धर्मरक्षणासाठी आम्ही सत्तेचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. सत्ता नव्हे, तर सिद्धांत महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री असतानाही आणि आज उपमुख्यमंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो.

महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय, व्यक्तीच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. गोसंवर्धनाला शेतकऱ्यांचे उत्पन्न, जैविक शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडून गोशाळा आत्मनिर्भर करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धाराशिव ही नामांतरे तसेच प्रतापगड आणि विशाळगडच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी केलेल्या कार्याचाही उल्लेख केला.

अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ धाम, उज्जैनचा महाकाल कॉरिडॉर, चारधाम, सोमनाथ, द्वारका, रामेश्वरमचा विकास, योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि नमामि गंगे अभियान हे सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य, दिव्य, सुरक्षित आणि स्वच्छ करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंदिरांसोबत रुग्णालये, तीर्थक्षेत्रांसोबत आधुनिक शाळा आणि विकासासोबत सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास, योग, संस्कृत, भगवद्गीता आणि नैतिक मूल्यांचे संस्कार नव्या पिढीला देण्याचे आवाहन त्यांनी केले. सनातन धर्म आणि लोकशाही संस्थांविरोधात अविश्वास व अराजकता निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात वैचारिक एकजूट आवश्यक असल्याचे सांगत संतांचे आशीर्वाद, युवकांची शक्ती आणि शासनाचा सेवासंकल्प यातून भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘ना झुकेगा स्वाभिमान, ना बदलेगा विचार’ या घोषणेसह त्यांनी ‘हर हर महादेव, जय श्रीराम’च्या जयघोषात भाषणाचा समारोप केला.

वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित ‘संस्कृती संसद २०२६’ कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरीजी, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष जगद्गुरू पूज्य अविचल देवाचार्य महाराज, अखिल भारतीय संत समिती व गंगा महासभेचे राष्ट्रीय महामंत्री पूज्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज आणि कोषाध्यक्ष महामंडलेश्वर पूज्य जनार्दन हरिजी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. या आध्यात्मिक महाकुंभाच्या व्यासपीठावर धर्मपुरम अधिनमचे २७वे पीठाधिपती कैलाश्री, जगद्गुरू रामानंदाचार्य रामकमलाचार्य महाराज, पूज्य श्री राजेंद्र दासजी, पूज्य श्री मनमोहन दासजी, राधे राधे महाराज, आचार्य रामकृष्णदासजी, माधवजी महाराज राठी, शिवरूपानंद स्वामीजी, शिवाचार्य महाराज आणि काशी विद्वत परिषदेचे प्राध्यापक रामनारायण द्विवेदी व रामचंद्रन पांडे यांसारखे देशभरातील नामवंत संत-महंत, धर्माचार्य व विद्वान उपस्थित होते. याशिवाय संस्कृती संसद आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील देवधर, शिवसेना आध्यात्मिक धर्मवीर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर. अक्षय महाराज भोसले, तसेच गंगा महासभेचे अध्यक्ष सत्येंद्र मिश्र आणि महामंत्री गोविंद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *