Siya Goyal : व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रेमी चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 3 जुलै 2026 पर्यंत वाढ केली आहे. पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणात पुढील तपासासाठी आणि ठोस पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाकडे कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागण्यासाठी न्यायालयासमोर खालील प्रमुख कारणे सादर केली होती:
केतनचा फाडलेला पासपोर्ट शोधणे
तपासात समोर आले आहे की, सिया गोयलने केतन अग्रवालचा पासपोर्ट त्याच्या बॅगेतून चोरला आणि मुंबईला जात असताना खोपोलीजवळील एका फूड मॉलमध्ये तो फाडून फ्लश करून टाकला. सियाला केतनसोबत प्री-वेडिंग शूटसाठी बाली (इंडोनेशिया) येथे जायचे नव्हते, म्हणूनच तिने हे कृत्य केले. या पासपोर्टचे अवशेष आणि पुरावे गोळा करणे पोलिसांना आवश्यक आहे.
डिलीट केलेला डिजिटल डेटा आणि चॅट्स रिकव्हर करणे
गुन्ह्याचा कट रचण्यासाठी सिया आणि चेतनने एकमेकांशी संवाद साधला होता. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत, परंतु गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया डेटा डिलीट करण्यात आला आहे. हा फॉरेन्सिक डेटा परत मिळवून (Data Recovery) त्याआधारे आरोपींची चौकशी करायची आहे.
‘क्राइम सीन री-क्रेएशन’
पोलिसांनी यापूर्वी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन ‘क्राइम सीन री-क्रिएट’ केला होता. मात्र, तिचा प्रेमी चेतन चौधरी याच्यासोबत ही प्रक्रिया करणे अद्याप बाकी आहे. चेतनने गुन्ह्यापूर्वी लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केली होती आणि हत्येची तालीम (Rehearsal) केली होती. तो कोणत्या ठिकाणी थांबला होता, हे शोधायचे आहे.
चेतन चौधरीची ‘गेट एनालिसिस’ चाचणी
या गुन्ह्यात एक अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा म्हणून पोलीस चेतन चौधरीची ‘गेट एनालिसिस’ (चालण्याची पद्धत विश्लेषित करण्याची फॉरेन्सिक चाचणी) करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती चेतनच आहे हे सिद्ध करण्यासाठी एआय (AI) टूल्सच्या मदतीने त्याच्या चालण्याच्या पद्धतीची पडताळणी केली जाणार आहे.
दोघांची समोरासमोर चौकशी आणि इतर संशयितांचा शोध
सिया आणि चेतन या दोघांनी मिळूनच हा संपूर्ण कट रचला की यामागे आणखी कोणाचे डोके होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, नवीन साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि त्यांना आरोपींसमोर उभे करून चौकशी करणे यासाठी पोलिसांना वेळ हवा होता.
प्रकरण काय?
18 जून रोजी पुणे येथील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, परंतु पोलिसांच्या तांत्रिक तपासात आणि सीसीटीव्हीच्या आधारे समोर आले की, मंगेतर सिया गोयल हिने तिचा प्रेमी चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. सियाला तिच्या कुटुंबाचा सामना करण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले, असा धक्कादायक खुलासाही तपासात झाला आहे.






