DNA मराठी

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी

img 20260625 wa0011

Sanjay Raut : उबाठा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. चिथावणीखोर भाषणाने राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. खासदार राऊतांवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी महिला सेनेच्या नेत्यांनी दिला.

शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली.

राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला.

राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *