Gopichand Padalkar : सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत आंदोलकांवर जोरदार टीका केली आहे.
रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिवाजी महाराज आमची अस्मिता असल्याचे स्पष्ट केले. पुतळ्याला विरोध नसला तरी ज्या ठिकाणी तो उभारला जात आहे, तेथे जातीयवाद आणि राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खेलोबा देवस्थानाच्या आवारात पुतळा उभारणे सहन केले जाणार नाही, तो अन्यत्र उभारावा, तसेच पुतळा उभारण्याची जबाबदारी दिल्यास तो वाजतगाजत उभारून दाखवू, असेही पडळकर म्हणाले.
यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आंदोलकांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरल्याचेही समोर आले असून त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.






