Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात होणाऱ्या पावसामुळे आता राज्यात देखील थंडी हळूहळू वाढत चालली आहे.
सध्या राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र राज्यात 21 जानेवारीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतही थंडीची तीव्रता वाढत आहे. शहरात थंड वारे वाहत आहेत. सकाळच्या वेळी उपनगरात वाढत्या थंडीमुळे शहरातील काही नागरिक उबदार कपडे परिधान करून शेकोट्या पेटवत आहेत. गेल्या आठवड्यापासून पुण्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुणेकरांना गुलाबी थंडीबरोबरच गारवाही सहन करावा लागत आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात आज सर्वात कमी 9.7 अंश तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी मुंबईत या हंगामातील नीचांकी तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान आठवडा संपेपर्यंत मुंबई आणि उपनगरात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुरुवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 17.5 अंश, तर कुलाबा केंद्रावर 20.5 अंश होते. दिवसाचे तापमान 30 अंशांच्या खाली आहे. IMD च्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांवर कमाल तापमान अनुक्रमे 28.6 आणि 29 अंश नोंदवले गेले.
संपूर्ण भागात हवामान कोरडे असल्याचे हवामान खात्याने सांगितले. किमान तापमानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे आज किमान तापमान 10.3 अंश नोंदले गेले. मात्र, गुरुवारी विदर्भात थंडी कमी झाली असून तापमानाचा पारा चढला आहे.