Anandraj Ambedkar : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी थेट भाष्य करत जरांगे यांना चांगलाच टोला लगावला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत सध्या मला काही बोलायचे नाही. फुकटचे सल्ले मी कोणालाही देत नाही असा बोचरा प्रहार आंबेडकर यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या भूमिकेला आता त्यांच्या समाजातूनच मोठा विरोध होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपोषण हे प्रभावी हत्यार असते; मात्र वारंवार त्याचा वापर केल्याने त्याची धार बोथट होते, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही जेव्हा मराठा समाजाला सोबत घेऊन सत्तेत येऊ, तेव्हा मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊ
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी इच्छा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही व्यक्त केली होती, असा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला. मात्र, मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे वेगळी भूमिका आणि वेगळा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही जेव्हा मराठा समाजाला सोबत घेऊन सत्तेत येऊ, तेव्हा मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊ असा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.जरांगे यांच्या आंदोलनावर थेट सल्ला देण्याचे टाळत फुकटचे सल्ले मी कोणालाही देत नाही या एका वाक्यात आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.






