DNA मराठी

latest news

img 20250915 wa0022

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश

Karanji Flood : अहिल्यानगर जिल्ह्यात रविवार रात्रीपासून पुन्हा एकदा मुसरधार पाऊस सुरू झाला आहे. यातच 15 सप्टेंबर पहाटे पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्यापही चार ते पाच लोक पुरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या करंजी मध्ये सतर्क आहे. पावसाचा कहर अहिल्यानगर जिल्ह्यात रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी, घाटशिरस, मढी या गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. घरात पाणी, गोठ्यातील जनावरे वाहून गेली, शेतीचे प्रचंड नुकसान असे संकट शेतकऱ्यांवर कोसळलं आहे. तलाव फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथके गावांत दाखल झाली असून बचाव कार्य सुरू झाले आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 15 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश Read More »

Solapur Crime : धक्कादायक, प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर घेतली गोळी झाडून

Solapur Crime : बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका कारमध्ये तरुणाचा गोळ्या झाडून स्वतः ला संपावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी तसेच घटनास्थळी सापडलेल्या शस्त्रच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्राम पोलिस पाटील यांनी याबाबत वरा पोलिसांना माहिती दिली की, गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी आहे. कार पूर्णपणे लॉक असून, आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेले असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख गोविंद जगन्नाथ बरगे (रा. मसला, ता. गेवराई, जि. बीड) अशी पटली. चौकशीत समोर आले की, गोविंद बरगे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता. नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली.आत गोविंद बरगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत होता. त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या.गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाळे करीत आहेत. पिस्तुलावरील परवाना आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची व गायकवाड कुटुंबीयांची चौकशी केली आहे. प्रेमसंबंध तुटल्याने वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असला तरी इतर सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. डीवायएसपी सायकर म्हणाले, “प्रेमसंबंधातील वादामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे; मात्र आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.” सध्या कोणालाही अटक झालेली नाही. बार्शी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन अशोक सायकर उपविभागीय पोलीस अधिकारी,बार्शी यांनी केले आहे.

Solapur Crime : धक्कादायक, प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर घेतली गोळी झाडून Read More »

img 20250910 wa0026

Public Safety Act : जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन; कायदा रद्द करण्याची मागणी

Public Safety Act : महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात घोषणा देत हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. आघाडीचे नेते म्हणाले की, “विधेयक हे हुकूमशाही वृत्तीचे आहे. सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी याचा अस्त्रासारखा वापर होऊ शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी आधीच कठोर कायदे अस्तित्वात असल्याचे सांगत, हा नवा कायदा अनावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अदानीसारख्या भांडवलदारांचे रक्षण करण्यासाठी व त्यांच्याविरोधात कोणतेही आंदोलन होऊ नये यासाठी सरकारने हा कायदा आणल्याचा आरोप नेत्यांनी केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. या वेळी काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड, माजी आमदार अशोक जाधव, भाकपाचे खजिनदार संदीप शुक्ला, अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव, माजी नगरसेवक रघुनाथ थवई, प्रवक्ते अर्शद आझमी, तसेच आनंद यादव, जयवंत लोखंडे, रोशन शहा, राजेश इंगळे, कृपा शंकर सिंग, निलेश नानचे आणि माकपाचे पदाधिकारी यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते व स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Public Safety Act : जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन; कायदा रद्द करण्याची मागणी Read More »

Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मुंबई रेल्वे पोलिसांनी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३१५.४६० ग्रॅम सोनं, रोकड अशा मिळून तब्बल २२ लाख २४ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनंतर युनिट -३ गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा पद्धतशीर अभ्यास करून दोन आरोपींना अटक केली. वकार आलम तौकीर खान आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा या दोघांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्ह्यांची कबुली दिली. या कारवाईमुळे कल्याण, कर्जत, डोबिवली आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील १६ प्रकरणांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती विवेक कलासागर पोलीस आयुक्त GRP मुंबई यांनी दिली आहे.

Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

milind deora

Milind Deora : दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप; मराठी एकीकरण समितीची तीव्र प्रतिक्रिया

Milind Deora : राज्यसभेतील खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी आंदोलनांचे ठिकाण दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवण्याची सूचना केली आहे. देवरांनी म्हटले आहे की, दक्षिण मुंबई हे राज्याच्या शासन, सुरक्षा आणि अर्थकारणाचे केंद्र असून, येथे मुख्यमंत्री सचिवालय (मंत्रालय), विधीमंडळ, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, पोलिस दलाची कार्यालये तसेच वेस्टर्न नेव्हल कमांड यांसारख्या महत्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो आणि शासन, सुरक्षा तसेच खासगी क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम होतो. म्हणूनच अशा आंदोलनांना इतर ठिकाणी हलवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. तथापि, या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे, “बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे.” देवरांच्या पत्रामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली असून, आंदोलने हा लोकशाही हक्क असून त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही, असे मराठी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Milind Deora : दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप; मराठी एकीकरण समितीची तीव्र प्रतिक्रिया Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणानुसार कारखाने अधिनियम १९४८ मध्ये विविध सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत. या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहू शकते. कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे याऐवजी ६ तासापर्यंत ३० मिनिटे असा करण्यात आला आहे. आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासावरुन १२ तास करण्यात आला आहे. अतिकालिक कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही यावरुन १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात येणार आहे. अर्थात अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल, अशी कठोर तरतूद सुद्धा त्यात आहे. याचबरोबर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील. या सुधारणांनुसार दैनंदिन कामाचे तास ९ वरुन १० करणे, त्यास अनुसरुन विश्रांतीच्या सुट्टीच्या कालावधीत बदल करणे, तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यकालयोजन साडेदहा तासांवरून १२ तास करणे, अतिकालिक कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करणे इत्यादी सुधारणांस मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

balasaheb thorat

Balasaheb Thorat : तुमचे योगदान काय, तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल

Balasaheb Thorat : दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी तयार केली. पाणी देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण काम केले. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे पाटील यांना विचारला आहे. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरता 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली .1996 मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले. हे पाणी पुढे तिगाव माथापर्यंत नेता येईल याचा विचार करून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली. 2 ऑक्टोंबर 2006 मध्ये येथे पाणी पूजन केले. आपण जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतु पुल, काँक्रीट कामे, व लांबी करता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन पिंपळे नान्नज दुमाला ,पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तीगाव, वरझडी या गावांकरता मिळावे याकरता पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्यापर्यंत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली.कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केले. हे जनतेला माहित आहे. आपण आपणही अनेक वर्ष मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले. या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का ? असा सवाल विचारताना नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारी सुद्धा माहित नव्हती. काम कोणी केले कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहित आहे. खोट्या भूल थापा आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून ही भ्रम निर्माण केला जात आहे. यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली. मे आणि जून मध्ये चांगला पाऊस झाल्याने लवकर भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापुर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. याचा सर्वाधिक आपल्याला आनंद आहे. ही चारी मागील आठ महिन्यात झाली का ? असा सवाल करताना या चारीच्या कामात आपले योगदान काय ? असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व नवीन लोकप्रतिनिधी खताळ यांना विचारला आहे. कितीही भूलथापा द्या लवकर उत्तर देणार आपण दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण केले भोजापुरच्या चारीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाणी सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण काम आणि प्रयत्न केले. उपेक्षित सर्वांना पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

Balasaheb Thorat : तुमचे योगदान काय, तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल Read More »

modi

PM मोदींनी मोडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम; केली ‘ही’ मोठी कामगिरी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजकीय प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले, ज्यामुळे ते भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान (Prime Minister) राहिले. या कामगिरीसह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा विक्रम मागे टाकला आहे, ज्या ४०७७ दिवस पंतप्रधान होत्या. मोदींनी आतापर्यंत सलग २४ वर्षे प्रशासनात सक्रिय भूमिका बजावली आहे. प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून. ही कामगिरी इतर कोणत्याही भारतीय नेत्यासाठी दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे ते स्वतंत्र भारतात जन्मलेले (१९४७ नंतर) इतके दीर्घ कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधींनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत पंतप्रधानपद भूषवले आणि ४०७७ दिवसांचा कार्यकाळ सांभाळला. आता मोदींनी त्यांना मागे टाकले आहे. सलग सहा प्रमुख निवडणुका जिंकल्या पंतप्रधान मोदी हे आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ बिगर-काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत. सलग सहा प्रमुख निवडणुका जिंकणारे ते भारतातील एकमेव नेते आहेत. २००२, २००७ आणि २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुका आणि २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका. तथापि, या यादीत अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Nehru)आहेत, ज्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत एकूण ६१२६ दिवस पंतप्रधान राहून एक विक्रम केला. हा विक्रम मोडण्यासाठी मोदींना अजूनही सुमारे २०४८ दिवस या पदावर राहावे लागेल.

PM मोदींनी मोडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम; केली ‘ही’ मोठी कामगिरी Read More »