Sunetra Pawar: खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या दिल्लीतील लग्नाच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अनुपस्थित राहिल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमक्या का गैरहजर राहिल्या? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले होते.
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर सोमवारी दिल्लीत रिसेप्शनचा भव्य कार्यक्रम पार पडला. हा सोहळा राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेचा ठरला. देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पवार कुटुंबातीलही अनेक सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पार्थ आणि जय पवार उपस्थित, पण सुनेत्रा पवार गैरहजर
रिसेप्शनमध्ये पार्थ पवार आणि जय पवार दोघेही उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतले. सुनेत्रा पवार सोमवारी दिवसभर पुण्यात होत्या आणि त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या. त्यामुळे त्या दिल्लीला का गेल्या नाहीत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही चर्चा सुरू झाली होती.
मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागे कोणतेही राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही.
अनिल पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण
या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार यांचे काही कार्यक्रम आधीपासूनच निश्चित होते. त्यामुळे रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
अनिल पाटील यांनी विशेषतः सांगितले की, या अनुपस्थितीचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाला सुनेत्रा पवार पूर्णवेळ उपस्थित होत्या. कुटुंबातील इतर कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर रिसेप्शनलाही उपस्थित राहणे बंधनकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






