Parner News : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात सहा दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, या कारखान्यात 17 सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित असून या घोटाळ्याची व्याप्ती 249 ते 300 कोटी पेक्षा जास्त असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र सरकारने आतापर्यंत या प्रकरणात एसआयटी स्थापन न केल्याने पारनेर पोलीस स्टेशन समोर साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणात मिळाली माहिती अशी की, या कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्ज असल्याचे दाखवले आणि विक्रीची बेकायदा प्रक्रिया करण्यात आली. तसेच फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क कारखान्याचा विक्रीसाठी देण्यात आले. त्यामुळे या व्यवहारात सरकारचा दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला असा देखील आरोप करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे ज्यादिवशी कारखान्याची विक्री केली त्याच दिवशी क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला. त्यामुळे पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता फक्त 32 कोटी रुपयांना खरेदी करून त्यावर 249 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यामुळे कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने 17 हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करून या प्रकरणात एसआयटीची मागणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.