Dnamarathi.com

Ram Sutar: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.

या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील या दीपस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *