Petrol Price Today: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समप्रमाणात वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी वैभव कलुबर्मे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , पुणे व मनमाड येथील इंधन डेपो निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधनाचा अविरत पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
इंधन वाटपावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना सुरळीत सेवा मिळणे आवश्यक असून पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. पुरवठा साखळी सक्षम ठेवणे तसेच नागरिकांना वेळेत इंधन उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठा, पुरवठा व्यवस्था, वाहतूक समन्वय तसेच विविध तालुक्यांतील इंधन उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.






