Ahmednagar News: पारनेर तालुक्यातील निघोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निघोज – वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रविण भुकन यांच्या मालकीच्या जत्रा या हॉटेलमधील प्रविण भुकन या़च्यावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामध्ये प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री दोन वाजता नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर गणेश भुकन यांनी रात्री निघोज पोलीसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली असा आरोप गणेश भुकन यांच्याकडून करण्यात आला आहे.
हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी हप्ता दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निघोज आणि परिसरातील असून भुकन हे सध्या नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.
त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते शुद्धीवर आल्यावर पोलीसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.
गेली काही दिवसांत निघोज आणी परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निघोज परिसरात चर्चा सुरू आहे.