Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा हा सरकारवर टिका करण्यामुळे चर्चेत असतो. आता नीट पेपरफुटी प्रकरणामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला त्याने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात सोनम वांगचुक हे उपोषनाला बसलेले असून त्यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे. कुणाल कामराने बुधवारी (15 जुलै) आंदोलनात सहभागी होऊन एक विधान केले होते, त्यामुळे तो अडचणीत आला आहे.
तुम्हाला जर कोणी मोदी समर्थक भेटला किंवा भाजपचा मतदार भेटला आणि तो मोदींनी केलं ते योग्य केलं असं म्हणत असेल तर त्याच्याशी वाद घालत बसू नका, कारण तुमचा वेळ वाया जाईल. सोनम वांगचुक यांच्या रुपाने आपल्या देशातील आणखी एक गांधी येथे उपोषणाला बसले आहेत. गोडसेवादी लोकांना काही फरक पडत नाही. मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच या आंदोलनाची पहिली वीट रचली गेली असं कुणाल कामरा म्हणाला.
तसेच याच भाषणात त्याने एक विधान केले, त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. “ये सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर रहे है” (भगवान रामाचे नाव घेऊन ते मुकेश अंबानींचं काम करत आहेत) असे त्याने सरकारला उद्देशून म्हटले आहे. याच वाक्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अमिता सचदेव यांनी कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. कुणाल कामराने या भाषणाचा व्हिडिओ डिलीट करावा आणि तातडीने माफी मागावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
वकिल अमिता सचदेव यांच्यामते, कुणाल कामराने सरकारवर खुशाल टिका करावी, पण देवाचे नाव बदनाम करु नये. देवाचा अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे कुणालने जाहीरपणे माफी मागावी असे अमिता सचदेव यांनी म्हटले आहे.






