DNA मराठी

भारतातील परिस्थिती धक्कादायक, सोशल मीडियावर मात्र वेगळंच चित्र

Screenshot 2025 05 04 14 15 52 77 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

Maharashtra Politics : देशात गेल्या अनेक दिवसांपासून धर्माचे तसेच जातीचे राजकारणात भर पडताना दिसत आहे.त्यामुळे आज भारत दोन वेगवेगळ्या वास्तवांमध्ये विभागला गेला आहे.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर ग्लॅमरस, देशभक्तीचा उद्रेक, आर्थिक प्रगतीचे आकडे आणि सत्ताधाऱ्यांचे गोडवे दाखवणारी मंडळी आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर  शेती संकट, बेरोजगारी, महागाई, प्रशासनाचा ढिसाळपणा आणि नागरिकांच्या जीवनात आलेली अस्थिरता दिसून येत आहे.

सोशल मीडियाचे स्वप्नील वास्तव

आज सोशल मीडियावर “न्यू इंडिया”चे जे चित्र रंगवले जात आहे, त्यात भारताला एक विश्वगुरु, मजबूत आणि अस्मितेने भरलेला देश म्हणून सादर करण्यात येत आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर देशाची प्रतिमा अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित दाखवली जात आहे.

पंतप्रधानांचे भाषण, सरकारी योजनांचे व्हिडीओ, तरुणांनी यश मिळवलेले प्रेरणादायक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या यंत्रणाही सोशल मीडियावर अग्रेसर असून विशिष्ट विचारसरणीचे ट्रेंड पुश करण्याचे काम नेटकेपणाने करत आहेत.

यातच पारंपरिक मीडियाचा (विशेषतः टीव्ही न्यूज चॅनेल्सचा) सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक मुख्यधारेतील चॅनेल्स सत्तेच्या जवळ गेले असून विरोधकांच्या टीकेपेक्षा राष्ट्रवादाचे बेमालूम प्रदर्शन करण्यात अधिक रस घेतात. यातून निर्माण होणारी एक बाजू म्हणजे ‘सगळं काही ठिक आहे’ असा समज जनतेत रुजवला जातो.

ग्रामीण व स्थानिक भारताचं वेगळं वास्तव

पण या सर्व ग्लॅमरपलीकडे, जो माणूस खऱ्या अर्थाने भारताची नाडी सांगतो. तो सामान्य नागरिक त्याचं वास्तव खूप वेगळं आहे. ग्रामीण भागात अजूनही सिंचनासाठी पुरेशी पाणीव्यवस्था नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ कागदावरच आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळवण्यासाठी कष्टकरी लोकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागते.

शहरांमध्येही परिस्थिती फार वेगळी नाही. लाखो शिक्षित युवक रोजगाराच्या शोधात आहेत, पण सरकारच्या आकड्यांमध्ये बेरोजगारी दर कमी असल्याचं भासवण्यात येतं. आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, महागाई, भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासीनता ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब मुख्यधारेतील मीडियात फारसे दिसत नाही.

सत्य दडपण्याचे धोरण

माहितीचा युगात माहितीचाच वापर करून सत्य लपवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. सोशल मीडियावर जे चित्र दिसतं ते व्यवस्थेने तयार केलेलं आहे. प्रत्येक टीका ‘राष्ट्रद्रोह’ ठरवली जाते. ज्या पत्रकारांनी, समाजकर्मींनी, किंवा सामान्य नागरिकांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यामुळे एक प्रकारचं भयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

वाटचाल कोणत्या दिशेने?

या साऱ्या परिस्थितीत प्रश्न असा उरतो की, देश कुठल्या दिशेने चाललाय? जर मिडिया आणि सोशल मीडियावरून मिळणारी माहिती खोटी, अपूर्ण किंवा व्यवस्थेनं नियंत्रित असेल, तर सामान्य माणसाला सत्य कसं कळणार? लोकशाहीची खरी ताकद ही मोकळ्या संवादात असते. पण आज तो संवादच एकसुरी आणि व्यवस्थानुरूप झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *