DNA मराठी

Umesh Patil on NCP Merger :विलिनीकरणासंदर्भात चर्चा ‘ना औपचारिक, ना अनौपचारिक.. ना आमच्या बाजूने… ना त्यांच्या बाजूने..

ncp

Umesh Patil on NCP Merger : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या बातम्या तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित केल्या जात होत्या. मात्र विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नाही. ना औपचारिक, ना अनौपचारिक.. ! ना आमच्या बाजूने… ना त्यांच्या बाजूने.. ! हे आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान खोटे नॅरेटीव्ह सेट करून स्वत:चा राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी माध्यमांचा वापर करणाऱ्या तथाकथित ‘सूत्रां’वर किमान आतातरी विश्वास ठेऊ नये असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले आहे.

सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्या पुण्यात असताना पक्षाचे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांना भेटायला जाणे अत्यंत स्वाभाविक आहे. मतदारसंघातील विकासकामे, जिल्हा नियोजन समितीचे विषय, मंत्रालयात प्रलंबित असलेली कामे यासाठी आमदार आपल्या नेतृत्वाची भेट घेणार नाहीत, तर कोणाची घेणार? असा सवाल करतानाच अशा नियमित भेटींनाही वेगळा राजकीय रंग देऊन ‘पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली’ अशा बातम्या प्रसारित केल्या जातात.यामागे नेमका कोणाचा अजेंडा आहे? असा प्रश्नही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग गेल्या आठवडाभरात या बातम्या माध्यमांना नेमक्या कोणी पुरवल्या? आम्ही सुरुवातीपासून सांगत असलेली वस्तुस्थिती दुर्लक्षित करून तथाकथित सूत्रांच्या माहितीवर विश्वास ठेवणे, हा आमच्या पक्षावर अन्याय नाही का?असा प्रश्न उमेश पाटील यांनी केला आहे.

काही मंडळी स्वतःचा छुपा राजकीय अजेंडा आणि व्यक्तिगत राजकीय हितसंबंध साधण्यासाठी माध्यमांचा वापर करून घेत आहेत का, याचा शोध आता माध्यमांनीच घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे इथून पुढे माध्यमांनी अशा अविश्वसनीय सूत्रांपासून सावध राहावे, एवढीच आमची अपेक्षा आहे असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा प्रमुख नेते यांच्याकडून वस्तुस्थितीची खातरजमा करावी. माध्यमांची विश्वासार्हता हीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. ती कोणाच्याही छुप्या राजकीय अजेंड्यासाठी पणाला लागू नये..! अशी अपेक्षा उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं..! असेही उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *