imtiyaz Jaleel : मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी मागणी केली आहे.
“ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत. पण जर आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते. त्याशिवाय वाळू माफी असेल किंवा दुसरे काही असेल. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? त्यामुळे जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी राज्य सरकारचं संरक्षण आहे असे दिसत आहे,” असा गंभीर आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.