Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर एकच महिन्यात पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल केले आहे. यात बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर एक महिन्यात राज्यात एकून 15 गुन्हे दाखल झाले आहेत.
पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे.
विशेषता यात महिलांचे शारीरिक शोषण, आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड रंजना गवांदे , सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून केले आहे.
“खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे यावे, असे आवाहन अंनिस करत आहे “ -संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस
गेल्या एक महिन्यातील दाखल गुन्हे:
1) अशोक कुमार खरात , नाशिक
2) गडगेबाबा ( राजेंद्र गडगे) , संगमनेर , अहिल्यानगर
3) चेतन सुनील माळी ( मूर्तिजापूर, अकोला )
4) पंकज देवराम घोलप, (येडगांव, पुणे )
5) मनोहर मामा भोसले, (कुरुडवाडी , सोलापूर )
6)नाना बर्डे , (आळे फाटा , पुणे )
7) ऋषिकेश वैद्य ( वसई .मुंबई )
8) अल्ताफ रईस खान ( मालाड, मुंबई)
9) रिधम पांचाळ ( मालाड, मुंबई )
10) गणेश शिंदे ( श्रीरामपुर, अहिल्यानगर )
11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई
12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
13)किसन तळपे मंदोशी, खेड
14 ) महेशगिरी ( महेश काकडे) निफाड,नाशिक
15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड






