Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील शेती महामंडळाची ४ हजार २०० एकर जागा दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प या तीन महत्वपूर्ण उद्योगांसाठी मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी डीआरडीओला ( संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) १५०० एकर, सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १२०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टीरीज लिमिटेडला १५०० एकर अशी ४२०० एकर जागा देण्यात आली आहे.
बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
49 वर्षांच्या करारावर देणार जमीन
या संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरारावर (लीजवर) देण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले असून, तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
या संस्थांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २,३०० एकर आणि अन्य १,६०० एकर अशी एकूण ३,९०० एकर अकारी पड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे उपसमितीने स्पष्ट केले.






