Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अजित पवार गटातील जवळपास २० आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीसाठी आमदारांकडून वेळ मागितला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये घडणाऱ्या राजकीय हालचालींमुळे विलीनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही गटांमधील राजकीय संवादाबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली.
त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटींमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
20 आमदारांच्या भेटीमागे नेमकं कारण काय?
अजित पवार गटातील जवळपास २० आमदार शरद पवार यांची भेट घेण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. या आमदारांच्या भेटीमागे केवळ सदिच्छा भेट आहे की पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत काही महत्त्वाची चर्चा होणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासमोर अनेक राजकीय आव्हाने उभी राहिली आहेत. पक्षातील नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुकांमधील रणनीती या मुद्द्यांवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याशी संवाद साधण्याची काही आमदारांची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे.
प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर पार्थ पवार यांच्या भेटीनेही राजकीय चर्चांना नवी दिशा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे संकेत दिले होते. अजित पवार हयात असते तर फेब्रुवारी महिन्यातच दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले असते, असेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. या विधानामुळे विलीनीकरणाची चर्चा केवळ राजकीय अफवा नसून त्यामागे काही घडामोडी सुरू होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभाग घेतला होता. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवली.
आता दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढत असल्याने भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असल्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. तसेच २० आमदारांच्या संभाव्य भेटीचा नेमका अजेंडा काय असेल, हेही स्पष्ट झालेले नाही.
आगामी काळात शरद पवार यांच्यासोबत होणारी चर्चा आणि दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका यावर राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकारणाची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत उत्सुकता वाढली आहे.






