Dnamarathi.com

EVM Hack: अलीकडच्या काळात निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अमेरिकेच्या माजी खासदार आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धक रहींल्या तुलसी गब्बार्ड यांनी एक खळबळजनक दावा करत जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हॅक केल्या जाऊ शकतात आणि निवडणुकीचे निकाल मनमर्जीने फिरवले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, त्यांनी असा दावा केला आहे की अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडे यासंदर्भात ठोस पुरावे आहेत.

तुलसी गब्बार्ड यांचा हा आरोप निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. त्यांनी नमूद केलं की, अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रणा डिजिटल स्वरूपाच्या असल्या तरी त्या शंभर टक्के सुरक्षित नाहीत. “या यंत्रांमध्ये एकतर दूरस्थ प्रवेशाचा धोका आहे किंवा आतूनच छेडछाड होण्याची शक्यता आहे,” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार काय?

तुलसी गब्बार्ड यांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजकडे असे संकेत आहेत की काही देशांमध्ये निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप झाला आहे. त्या देशांमध्ये हॅकिंगद्वारे मतदानाच्या आकडेवारीत बदल घडवण्यात आला. हा हस्तक्षेप कितपत खोलवर गेला याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील संदर्भात चर्चा गरजेची

भारतातही ईव्हीएम यंत्रांवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या यंत्रणांवरील संशय व्यक्त केला आहे, मात्र निवडणूक आयोग सातत्याने या यंत्रांच्या विश्वासार्हतेचा पुनरुच्चार करत आला आहे. तुलसी गब्बार्ड यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय राजकारणातही नव्याने चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.

लोकशाहीसाठी धोका की सुधारण्याची संधी?

ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जाणं ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. लोकांनी दिलेल्या मतांचा आदर राखणं आणि त्यांचं अचूक प्रतिबिंब निवडणुकीत उमटणं हे कोणत्याही लोकशाहीची खरी ताकद असते. त्यामुळेच या प्रकारच्या आरोपांची सखोल चौकशी होणं, यंत्रणांची पारदर्शकता वाढवणं, आणि जनतेला विश्वास देणं अत्यंत गरजेचं आहे.

तंत्रज्ञानावर विश्वास ठेवायचा का?

ईव्हीएम हॅक होऊ शकतात, हे जर खरं असेल, तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरचं भिस्त असलेल्या लोकशाही व्यवस्थेला मोठा धोका आहे. मात्र, केवळ संशयाने निर्णय घेणंही योग्य ठरणार नाही. तंत्रज्ञान हे साधन आहे, हेतू नाही. त्यामुळे यंत्रणांची खातरजमा, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य, आणि जनतेच्या विश्वासाची पुनर्स्थापना ही काळाची गरज बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *